संत जातीचे सर्वांसी अद्वेषी
हकनक त्यांला हे सर्वहि जन कीं द्वेषी
वरतीं दाविती गवलता हे देशी
त्यांच्या सन्मानें परम होती क्लेशी - धृ.

गायी हिंदूंसी परम पूज्यमान
देखुनि दुश्‍चित्त मनिं हे मुसलमान
खाउनि दुभतें कीं निदानिं हे बेइमान
सुंदर वनितेचा कामि पुरुष दुस्मान -  1

वृक्ष आहे कां उगाचि अपुले ठायीं
वाटेन जातो तो मौजेन घाली घायी
तो तंव कोणाचें काहिंच खात नाहीं
अन्यायाविणें घडती हे अपायी - 2

चंद्रोदयीं कीं समस्त सुखी होती
तस्कर देखोनी परम दु:खी चित्तीं
अस्त व्हावा हें सतत ह्रदयीं चिंती
निंदक जनांसी साधुची तैसी खंती-3

हंस सेवितो सहज मुक्ताफळें
स्वाद कैसा तो नेणती कावळे
त्यांच्या अंगीचें जरि कां मांस मिळे
मूर्ख साधूंच्या लांछनिं देती डोळे - 4

ज्याणें साधूंची संगती धरावी
त्याणें आधींच पुरती पारख घ्यावी
जिविंची खूण हे जातिनिशीं समजावी
परतुनि सोहिरा म्हणे प्रीत विटों न द्यावी - 5