आम्ही नहों हो पांचांतले, नहों पंचविसांतले
एवढ्यांहि वळखोनिया, वेगळे आम्हीं आंतले - धृ.

सत्व, रज, तम आम्ही, नहों त्रिगुणांतले
केवढाही प्रपंच केला तरी नहों आम्ही त्यांतले - 1

आम्ही नहों मंत्रातले, नहों हो तंत्रांतले
बहुत बोलुनि काय, आम्ही नहों मायेच्या यंत्रांतले - 2

आम्ही नहों हो लक्षांतले, नहों हो पक्षांतले
सोहिरा म्हणे अनिर्वाच्च, आम्ही केवळ अलक्ष्यांतले - 3
आदि नाहीं अंत । तोचि आपुला सिद्धांत - ध्रृ.

पाहतें पाहणें जेथ विसाव्या आलें ।
उन्मनीं रिघालें मन कीं हें - 1

आकाशाचा डोळा, चिन्मय सर्वांगचि झाला ।
मजमाजी देखिला नाहीं कोणी - 2

मीचि मजला नुरें जागा, दुजा उरे तेथ कें  गा ।
सोहिरा म्हणे हें सहज, निजवर्म बुझों कीं  गा -3
सदाचि संतोषमय । आंत आम्हीं आहों हो - धृ.

मन हें चंचळ, विसंबों ना पळ ।
निश्‍चळ निर्मळ, निरंजनीं राहूं हो - 1

खेचर भूचर, आणि हें जळचर ।
आइतें चराचर, नवल हें पाहूं हो - 2

नेमिलें जें असें, दृष्टिीसी न दिसे ।
चिंताचि ते नसे, होणार तें होऊं हो - 3

सोहिरा म्हणे तें साहूं, देवाला या नित्य गाऊं ।
देईल तें खाऊं, वर सोंग दावूं हो - 4

तसा तूं भज रे अपुल्या मुळाला - धृ

न दावितां गोडी गुतुनियां चाडीं
शोधुनि काढि जशि मुंगि गुळाला - 1

कोठें तें वन कोठें जीवन
धांवत कोरि भ्रमर जैसा कमळाला - 2

चंदन अंग  उमजुनि चांग
जडला तो नाग जसा किं परिमळाला - 3

म्हणे सोहिरा देवभक्त एकचि होती
ज्योतीला ज्योती मिळोनि जाय,
जसें लवण जळाला - 4
मुखीं सत्य बोलणें सत्य बोलणें । निजानंदे डोलणे - धृ.

दहावें द्वार उघडलें, मन ब्रह्मीं जडलें ।
त्याचें इष्टानिष्ट पडलें । लोकांनी काय करणें - 1

धर्म कीं अधर्म घडो, सुखदु:ख गळां पडो ।
कांहीं असलें तरि, अनुभवबळें तोलणें -2

आपण तत्त्वींचा जो देखणा ।
ह्रदयांतिल मीपणापरतें खोलणें -3

सोहिरा म्हणे आपुलें हित, पहावें हे विहित ।
ज्याला न कळे आपुली रीत, त्यास काय बोलणें - 4
आतां तरि सोडी  रे ! हा संग । जनिं वनिं हो नि:संग - धृ.

विषयसंयोगें धरिसी सोंग । दु:खेंंचि होसी दंग ।
अभ्र सावुलीं जेविं बाहुली । बेगडिचा हा रंग - 1

परनारीशीं करूनि उपरती । आवरिं हा कीं अनंग ।
ब्रह्मरसाचे भावनेविण । रजतमें होय जीव वंग - 2

योगाभ्यासें करूनी साधीं । बैठक पवन तुरंग ।
धांवे जेथ कीं तेथ धरावा । हा मन चपल कुरंग -3

नसोनि दिसतें केवळ जग हें । मृगजळिंचे किं तरंग ।
चिद्भानु हा कारण आत्मा । पहा तूं कीं अंतरंग -4

म्हणे सोहिरा निर्गुण ध्यानीं नये तरि, । स्मरिं सांवळि मूर्ति सुरंग ।
वैकुंठपति हा व्यापक विष्णु । अवघाचि कीं श्रीरंग - 5
झाले हो सुख चिन्मय बाई - धृ

भाव हरला, बोध मुरला,
प्रकाश उरला, सांगो मी कायी - 1

रूपरेखेविण मीनलें बाळक
अहं ओवाळुनि घेउं बलाई - 2

सोहिरा म्हणे आतां मिळणें ओवाळणें
हारुनि मी मज उरलें नाहीं  - 3
हरला काम, झालों आराम, जडला आत्माराम ।
विश्‍वाभ्रमव्योम, जें निजधाम, नाहीं रूपनाम - धृ.

त्रिवेणीसंगम, त्यावरी उगम, लाधला सुगम ।
झालों परागम, ना पुनरागम, उडाला विहंगम - 1

निजनरेंद्रा, ज्ञानसमुद्रा, पिउनी अर्धचंद्रा ।
मध्यम छिद्रा, खेचरीमुद्रा, ही लागली सहजनिद्रा - 2

दिसत नासत असत, म्यां असलाचि असें सत् ।
आदी ना अंत कैंची घस्त, हाचि चित्सुखवनवसंत - 3

संसारचित्र, पुसोनि हे नेत्र, म्यां झालों कीं स्वतंत्र ।
ना जन्मपत्र, तेथ कैचें गोत्र, नलगेचि दुसरा मंत्र - 4

नलगे आराधन, लाधलें हें धन, ओळखिला चिद्धन ।
पवनहि गिंवसोन, मुरालें हें मन, झालें कीं उन्मन - 5

पूर्णप्रबोध, आमोद समाध, हे लाधली अनादिसिद्ध ।
जो मूलकंद मुकुंद, स्वयें मजमाजी अद्वैतानंद - 6

ना प्रतिबिंब, हाचि हा स्वयंभ, विकासला निरालंब ।
आरंभरंभास्तंभ, पाहतां आंतचि झालों गैब - 7

सोहिरा म्हणे देहभानचि हरलें, चालणें बोलणें सरलें ।
तन्मय विरलें, चिन्मय मुरलें, काय नेणों हें उरलें - 8
गर्जता नवघन । मयूरचि नाचे ।
येरा काय त्याचें प्रयोजन -1

वाजतां नागसरी । नागचि तो डोले ।
आणि दिवड चाले । आपुल्या काजा -2

पंचम आलाप । ऐकत्या सोहळे।
बहिर्‍या काय कळे । त्याचें प्रेम -3

सोहिरा म्हणे होता ब्रह्म । साधु समाधान ।
उपसर्ग अज्ञान । तया नाहीं -4
लय लागलें आत्मारामीं । जाहला आनंद अंतर्यामीं - धृ.

बद्ध मारिला अहंकार हरामी । कर्म केलें कीं परिहरा मी ।
युक्त केलें कीं हवि रामीं । श्‍वासोच्छ्वास प्यालों वारा मी - 1

देहीं असोनी असें कीं न्यारा मी । कधीं न साहेंचि विकारा मी ।
कांहीं न घेंचि कल्पना घेरा मी । नाना योनींचा न फिरे फेरा मी - 2

वासना हे न ठेवीं उदारा मी । लुब्ध होईना घरदारां मीं ।
मन लक्षिला मोक्ष उदारा मी । शरण आलों दीनोद्धारा मी  - 3

कधीं न लिंपे संसारकेरा मी । यमधर्माच्या नाटोपें वैरा मी ।
गोष्टी सांगेन तीनतेरा मी । भगवानाचा होईन प्यारा मी - 4

विपरीतरीती इंद्रियग्रामीं । यांचा नायकेंच कधिं आग्रह मी ।
कधीं न जाय निंदानगरा मी । दशवेद्वारींच्या राहिलों अग्रा मी - 5

सोहिरा म्हणे या यंत्रा मी । देखियला कीं भ्रामयंत्रा मी ।
विसरेना विवेकमंत्रा मी । उगी पाहतों जीवयंत्रा मी - 6
हंसाचा चारा । न इच्छिसी वायस ।
आणि मेल्या मांस । भक्षितील त्याचे - 1

नागसरीचें सूख दिवडा केविं कळावे ।
उंदीरचि गिळावे । त्याणें पैं गा - 2

अग्निमाजी सती । एकलीच जळे ।
आणि पहावया मिळे । सकळ जन -3

तैसा कोणी न झोंबे । साधूच्या आनंदा ।
आणिक करावया निंदा । कित्येक मिळती -4

सोहिरा म्हणे यांत आमुचें काय गेलें ।
तुमचेचिं केलें पावाल तुम्ही - 5
जयाचें ते स्वरूप । वेदांसी अमूप ।
तेथें कोण माप । करू सके -1

जयाचे पवाडे । बोलों जातां तोंडें ।
ब्रह्मादिक वेडे । झाले जेथ -2

ऐसा आत्माराम । भावोनि आराम ।
जेथ सर्व काम । हारपळे -3

सोहिरा म्हणे ज्याचा । परिकर साचा ।
आपुले मुळींचा ठाव दावी -4
कवण कवणाचे नये हो संगातीं - धृ.

माता पिता बहिणी बंधु । दारासुत वृथाचि वेधु।
जाण हा स्वप्नींचा आनंदु। ममतापाशीं लाविती गोंदु।
तुझा परिणाम नसे त्यांच्या हातीं - 1

संसारी तुझे मन हें विकळे। परि मी कोण हें तुजला न कळे।
विषयविलासीं झांकुनि डोळे ।चंद्रोदयिंचे जसे कावळे।
शेवटी तुजला काय मिळेल पहा, मातिसी मिळेल या माती - 2

म्हणे सोहिरा संतसमागम। सुगम करोनि निजउगम।
चित्सागरीं मिळे त्रिवेणीसंगम। जयाला वर्णितां आगम निगम।
कुंठित जये भुवनीं तो दीपक लावीं निर्वातीं - 3
मी कोण कोठुनि आलों या शरिरीं हें स्मरण धरा रे - धृ.

कवण कर्म हें केलें । नरदेह कशानें प्राप्त जाहलें ।
सुखदु:ख हें कळुनि आलें । कैसें हाचि विचार करा रे - 1

स्थूलसूक्ष्म पंचभुतांचें । मिथ्या अवघें परि दिसतें साचें ।
लाघव सकळिक संसाराचें । सत्वर यांतुनि कडे सरा रे - 2

ज्ञानाचा अभ्यास करा । निजवस्तूतें ध्यानिं धरा ।
ध्यानें सर्वहि त्याग करा । मग निर्गुण नित्यानंदें पूर्ण भरा रे - 3

निरसुनियां कामक्रोध । करुनि इंद्रियां दृढ निरोध ।
जेणें होइल ब्रह्मबोध । हा अंतरिं घ्या शोध बरा रे -4

सोहिरा म्हणें हेंचि घ्यावें । दृश्यातीत मन हें व्हावें ।
फिरुनि अपुल्या मुळासि यावें । येणेंचि हा भवसिंधु तरा रे - 5

कांहीं सार्थक करीं तूं प्राण्या लौकर रे - धृ.

देह हें स्थूळ भ्रमाचें मूळ । प्रपंच म्हणणें अवघें खूळ । शेवटिं तुजला हें प्रतिकूळ ।
अंतीं कांहीं नाहीं, हें तंव दिसे क्षणभर रे - 1

सोडुनि स्वार्थ धरी परमार्थ । आत्महिताविण फिरणें व्यर्थ ।
गुरुमुखें समजुनि घ्यावा अर्थ । सांगितलें तुज तें तें कांहीं चित्तीं धर रे - 2

शरिरीं कवण हा साक्षी पाहा । त्याला पाहुनि तेथचि रहा । ध्यास निरंतर तोचि वाहा ।
विश्‍वातीत परमात्मा तो हा । तद्रुपची होउनियां जीव उद्धर रे - 3

अनंतरूपीं हा अनंत वसतो । दृष्टीविण हा सदैव दिसतो । कांहिंच नाहीं त्या रूपीं असतो ।
सर्वगतचि कीं, व्यापक हा विश्‍वंभर रे - 4

म्हणे सोहिरा निश्‍चय व्हावा । तरीच तुजला पडेल ठावा ।
केवळ मिळसी जरि सद्भावा । स्तवि वेद वदनीं नित्य वदावा ।
महादुस्तरची भवनदि कीं हे माया तर रे - 5
संसारी रमसी मना भ्रमसि तूं कां भोगिशी आपदा ।

अभ्रींची जसि साऊली दिसतसे कोणाचि हे संपदा ॥

शाल्यन्नोदन दिव्यभोग रति हे कीं नूपजे श्‍वापदा ।

सोहिरा म्हणतो विवेक नसतां आरुढुनी ज्या पदा ॥
तरि सार्थक हेचि करावें
सदैव आत्मस्वरूप स्मरावें - धृ

मानुं नये हें आवरावे
चैतन्य सर्वसमान धरावें
विश्रांति कळेला वरावें
पुनती जन्मुनियां न मरावें - 1

अनादि भूमिके स्थिरावें
मन हें गगनामाजि जिरावें
सर्व नासुनि जें कां उरावें
तेंचि कीं ह्रदयीं भरावें - 2

सोळां अतीत सतरावे
त्या परब्रह्मकशीं उतरावें
ब्रह्मरंध्रीं भीतरावें
हा संसार समुद्र तरावें - 3

म्हणे सोहिरा नलगे फिरावें
जेथिल तेथ मुरावें
देहभान विसरावें
हेचि वांछित मनिंचें पुरावे - 4
मग चिंता ते हो कशाची ? मुळीं सोडिलिया आशाची - धृ.

भ्रांति फिटली देहनाशाची, अवघी गेली अवदशाचि ।
चळती कळती दैवदशाची, प्रभा हे अविनाशाची - 1

प्रतीति नलगे हो विषाची, खाउनि विषयांची बा साची ।
हे ललिका भवपाशाची, समजुनि गुंडाळिल गा साचि - 2

योनी अपूर्व मनुष्याची, सेवा करणे जगदीशाची ।
संगत करणें सत्पुरूषाची, योगी ज्ञानी अंशाची - 3

म्हणे सोहिरा रहाणी जळीं माशाची, तेंवीं समाधि तमाशाची ।
बाल उन्मत्त जो पिशाचि । कृपा मोद देती निशाची - 4
पतितपावन दीनदयाघन करुणाकर देवा ।
श्रवणमनननिदिध्यासें निरंतर घडो तुझी सेवा ॥धृ॥

परमप्रकाशक तेजोमय हें गुप्त तुझें स्वरूप ।
परतुनि दृष्टि पाहणें पाहता निर्गुण हें अरूप ।
परमार्थ परिपूर्ण साधनी भरलें हें अमुप ।
परात्पर तूं अंतरसाक्षी ह्रदयभुवनदीप ॥1॥

तीन्ही संधी साधुनि घेणें सुख हें एकांतीं।
तीन्ही गुण हे निरसुनि शून्यीं उगवली हे ज्योती।
तीक्ष्ण ज्ञानें पुरतें पाहता कुळ नाही याती ।
तितुकी प्रतीति बाणलिया मग दिवस नाहीं राती ॥2॥

तलगत तलगत सकळहि जीव हे चित्सिंधू आंत।
तरंग जैसे उमटत भासत नासत हे बहुत ।
तरणोपाय सांगति साधू मत हे सिद्धांत ।
तरले येणे मार्गें बहुत देहीं देहातीत ॥3॥

पान्हा पिऊनी प्रेमकळेचा हरिलें संकल्पा ।
पाहतां पारापरेनें भवभय दोरीच्या सापा ।
पारंगत हे करूनि सकळही अहं सोहं कापा ।
पारख करितां तटस्थ जाहल्या नेत्रांच्या मलपा ॥4॥

वरिली शांति आंगी जाहला पूर्ण अनुभव ।
वरदबळें सद्गुरूप्रसादें अक्षय वैभव ।
वमिलें सकळहि मायिक आतां नाही भय भव ।
वदली वाणी मौनपणी हे रूप नाही नांव ॥5॥

नम्र होऊनि वृत्ति लागली अलक्ष हे लग्न ।
नटत नटत हे  लोक सकळ ही होऊनियां भग्न ।
नख नलगे जेथे देहबुद्धिचे विकासलें गगन ।
नमुनि सोहिरा म्हणेचि अवघा अलख निरंजन ॥6॥
ऐसे जाणावे ते भक्त । तेच योगी तेचि मुक्त -धृ.

पराकमळ परपराग । तेथ गुंतति जैसे भृंग -1.

निरंजन हेचिं गूळ । तेथ मुंगीच केवळ  -2

अनाहत नागसर चांग । तेथ जैसे कीं ते भुजंग  -3

समाधिधन निजज्योति । तेथ पायाळचि म्हणविती -4

सोहिरा म्हणे सत्रावीचें जीवन । तेथ नि:सिम जैसे मीन - 5
त्या देवाचें तूं दर्शन घे
संसार - मोहांतुनि त्वरित निघे ॥धृ॥

आदि मध्य ना अंत जयाला नेति नेति म्हणती वेद तयाला
ज्या पासुनि ॐकारहिं झाला ब्रह्मा विष्णू हर हे तिघे - 1

अगम अगोचर सत्ता ज्याची सहज लीला हे त्याची
जारज स्वेदज अंडज उद्भिज ज्यापासुनि हें सहज निघे - 2

दृश्य सकळही निवडुनि पाहतां निरालंबिं राहतां
प्राणापान उर्ध्वही वाहतां आनंदभुवनीं मन हें रिघे - 3

म्हणे सोहिरा शून्याकार रूप नाहीं आकार
परब्रम्हचि निर्विकार अंतरिं बाहेर अवघें -4
हरिस्मरण विस्मरण, तरि तुझें काय जिणें रे असून - धृ

स्वार्थनि साधिसि, सार्थक नेणसि कोणासि पाहें तरि पुसून
पुढें नाहिं गति, मळिण जहालि मति साधुंचि संगति नसून-1

रतीविलासीं, लंपट होसी मानस गेलें डसून
लवकर सर कीं पडशिल नरकीं, फुकट मरशिल कुसून-2

आळशि कामा, उगा रिकामा, थट्टाचि करिसी बसून
कुकर्माच्या, कांहि वर्माच्या, गोष्टि सांगसी किसूनल- 3

शरीर फिरवी, तुजला मिरवी, देव असे रे रूसून
जवळि असून तुझे ह्रदयिं वसून, भगवन्त नये रे दिसून - 4

म्हणे सोहिरा गुरुनाथ हा माझ्या ह्रदयीं घुसून
जनासि उद्धरावया कारणें वचन सांगतो ठसून - 5
लय हें भगवंतीं जरि लाय । मग हा प्रपंच केला तरि काय - धृ.

जैसी अभ्रींची हे छाया । कीं हे जाण नटाची जाया ।
अथवा मृगजळवत् हे माया । तैसी वाटत ज्याला काया ।
अवघेंचि मिथ्या दिसलें होय - 1

देहबुद्धि येतां भ्रांति । ह्रदयीं न धरे होते वांती ।
स्वस्थ बैसुनियां एकांतीं । कवण मी आहें आदीं अंतीं ।
ऐसें अखंड पाहत जाय -2

जैसे जाण सतीचे भोग । तैसें वर वर दिसतें सोंग ।
अंतरिं जीवशिवाला योग । नासुनि गेलासे भवरोग ।
मोह हा मनचाची मनीं खाय - 3

नयनीं नयेचि दृश्याभास । समूळ तुटला आशापाश ।
समग्र विकासलें आकाश । चंद्रसुर्यावीण प्रकाश ।
चित्त हे महाशून्यीं स्थिर होय - 4

झाला प्रसन्न हा गुरूराय । चुकवी जो कां भवरणघाय ।
त्याचे कधीं न सोडीं पाय । त्याला तनु मन घन हें वाय।
जो कां नित्य निरंजनीं धाय - 5

सोहिरा म्हणे सर्व समाय । विपरित गेले सर्व अपाय ।
हाता आला तरणोपाय । पिंडब्रह्मांडीं न माय ।
जन्म-मृत्यु-जरा अपाय । याचा कळला तरणोपाय ।
आंगीं आहे पुरती कमाय - 6

भजन करीं काहीं सुख दे तें - धृ.

कुतर्काचा मार्ग निरोधीं । न जावें आधीं मन विरोधीं ।
पुनरपि कधीं न करीं निंदेतें - 1

संतांशी सद्भाव धरावा । योगज्ञानाभ्यास करावा ।
सांपडेना उगें स्नानसंध्येतें - 2

साधनसंपत्तीला आढळेना । सद्गुरूवांचुनि तें कीं कळेना ।
करीं आत्मस्वरूप देतें - 3

सोहिरा म्हणे मोक्षचिंतन । चित्त लागे अलक्ष अचिंतन ।
पारंगत करी ब्रह्मपद तें - 4
अरे तूं धरूं नको, धरूं नको, लटिका हा अभिमान
शाश्‍वत नाहीं रे संसारीं, देहा कोण जुमान
जेथुनि आलासी जन्माला, तेथ घरीं इमान
सहसा होउं नको, होउं नको भगवन्तीं बेइमान - धृ.

हें तूं जाण रे सुजाणा, दो दिवसांचे बखत
आयुष्य कितुकें हें कळेना, कसा येतसे वखत
कांहीं गुरूमुखें समजुनि घे पाव निरंजन तखत्
याला दिरंग तूं करूं नको शेवटिं पडशिल फकत - 1

पुरता पहावा तनुचा चालक कोठें
सहसा नयेचि रे दाखवितां हा म्हणुनिया बोटें
रूपरेखेविणें देखे अगोचर हेंची गूढ मोठें - 2

सावध करितां रे घरबार  भजनाचा करभार
देउनि सोडुं नको दरबार मुळिंचा वारंवार - 3

स्वरूपसागरिंचे तरंग विचित्र नाना रंग
आवरि पवनाचा तुरंग अंबरिं चाल तूं अंतरंग - 4

गुप्त हे सत्ता कैसी तरज करुनि कामक्रोध हे वर्ज
करणें देवापाशीं अर्ज, ठेवुं नको जनाशीं गरज- 5

नको साधुंचि हे हरकत ययातें नाहिंच रे बरखत
निंद्यवादाचें बहुखत पुनर्बधिर मुका जन्मत - 6

आतां जीवत्व हें उद्वारीं चित्त देईं जगदुद्वारीं
चित्त देउं नको आकारीं सतत रम तूं निराकारीं - 7

सांडीं विषयांचा विलाप अवघा कर्मक्रियाकलाप
भगवद् गुणानुवाद आलाप महदानंदीं होई मिलाफ - 8

भव हा दोराचा रे साप कवणा असे पुण्यपाप
भ्रांति व्हावी हे नि:पाप अरुपीं मिळोनि आपोआप - 9

भेदुनि त्रिवेणिचा संगम अद्भुत मन हा सारेगम
सहस्त्रदळीं पावावा सुगम खरा मार्ग हा विहंगम - 10

जेथ वेदाद्य न चलति तर्क तेथ मावळले चंद्रार्क
महा अद्वेत पिउनियां अर्क सोहिरा म्हणे हो गर्क - 11
जग हें तरंगरंगसंग - धृ.

क्षणेक भास, विषयविलास ।
अवघा त्रास, अंतीं पावे नाश - 1

उना योगें उखरासंगें ।
देखोनी गंगे, ठकलीं जैसीं मृगें - 2

गळां शेळीचे स्तन, कीं हे आरशांतील धन।
जैसा जळावरिल फेण, जैसें निद्रिस्थाचें स्वप्न - 3

शरीर असे जंव, सकळ भासे तंव ।
विकारविंचूचें हें पेंव, लटिके चिंतेचा हा गांव -4

सोहिरा म्हणे कीं नेमीं, जड हें शरीर नोहे मी ।
अजीं राहतो निजधामीं, यांचा समुद्र तो कीं मी - 5
संतांचे दुर्गुण टाकुनि, श्रेष्ठचि गुण घ्यावा - धृ.

सुमनीं सुवास येतो मोठा, शेवंती सर्वांगाला कांटा - 1

दीपाअंगी अवगुण असती, प्रकाश होतां अवघे न दिसती - 2

द्वाड वनिता हे रूपवती, कामिक पुरुषा प्रियकर होती - 3

धनाची मोट ओझें भारी,  केवीं त्यागिती नर संसारी - 4

समुद्र क्षार न शमवी तहान, पुण्यासाठीं करणे स्नान - 5

हिरा कठिण नव्हे अरूवार, लेइल्या होती तालेवार - 6

क्रूर स्वभाविया रणशूर, त्याला अवश्य पाळी धूर - 7

बाळ, उन्मत्त, पिशाच्च साधु, मात्रचि घ्यावा ब्रह्मबोधु - 8

सोहिरा म्हणे ग्राहक ज्याचा, तोचि संग्रह करील त्याचा - 9
अजुनि तरी उमगा नव्हे हें सौख्य पहा शिमगा - धृ.

ज्या सौख्यातें आदिं अंतीं स्थितिंतहि होती क्लेश जगा
उडियेवरी उडी मारित मृगजल प्याया कष्ट मृगा -1

दु:खी भोगी दु:खी त्यागी दु:खी सोंगी ढोंगी रे
दु:खी यांचित दु:खी लुंचित दुखिया चित्र सरळ बघा - 2

खोटे मन हें खोटि कल्पना खोटे विषय कुरंगा
अनुभव मोठा समूळचि खोटा रंक स्वष्नींच्या या भागा - 3

म्हणे सोहिरा जें कल्पावें तेंचि पावे सुख रंगा
निर्विकल्प जें सत्य सौख्य तूं दु:ख इतर तें करिं भंगा -4
अभ्यासी मन लाव प्राण्या मोक्षपदाप्रति पाव रे - धृ.

दोरचि परि हा भुजंग भासत प्रपंच तद्वत माव
नित्य अनित्य विलोकुनि अंतरिं दृढ धरीं सद्भाव रे -1

शमदम साधुनि घालिं निरंतर संतसमागम नाव
उपरम उजरा सोहं झेलित भवनदितरणोपाव रे -2

इडा पिंगळा आकळुनि घेईं सुषुम्नेमाजी धांव
निमग्न होउनि ब्रह्मानंदीं परमसुख हें पाव रे -3

उपनिषदांचा अर्थ भरित निर्गुणसमुच्च गांव
म्हणे सोहिरा स्वयंप्रकाशक आत्मकळेचा प्रभाव रे -4
दळु बाई । दुळु तोंवरीच गाऊं ।
दळण विसावे तें सुख सेवूं ॥धृ॥

अभ्यासाचें जातें । विकार कणवट ।
दळुनि करूं पीठ । वासनेचें ॥1॥

मनपवन दळणारी । बारा सोळा नारी ।
कारणांचे घरीं । पीठ न्हेवुं ॥2॥

विवेकपाणियें । शून्याची पितळी ।
मळुनि करूं गोळी । ऐक्यत्त्वाची ॥3॥

त्रिकूट चूलवणी । वैराग्याचा अग्नि ।
कल्पनाइंधनी । जाळ करूं ॥4॥

भक्तिचा हा तवा । निश्‍चयेंशी ठेंवू ।
साम्यते बसवूं । नीट ऐसा ॥5॥

व्यतिरेक गोळी । अन्वयेंशी चढवूं ।
अभेदचि घडवू भाकरी हे ॥6॥

एकवेळ परतूं। सृष्टि नाहींपण ।
परतुनि मी पण पुरतें भाजूं ॥7॥

काढोनियां ठेवूं । आनंदे निववू ।
परेपरतें सेंवू । लागों पुढे ॥8॥

सोहिरा म्हणे ऐशी । सेवितां भाकरी ।
नलगेचि चाकरी । करणें आतां ॥9॥
आहे तेवढें बरें । जरि का कल्पना मुरे ॥धृ॥

वनिंचिया तरुवरां । शिंची कोण तरी निरा ।
सहज हालतीं समिरें ॥1॥

संचित क्रियमाण।पहिलें बांधोनि प्रमाण ।
देह धरिलें गिरिधरें ॥2॥

ज्याचा तोचि कर्ताहर्ता ।नसता अभिमान धर्ता ।
म्हणऊनी जीव हें नाम उरे ॥3॥

प्रपंच परमार्थाला । नाणी द्वैत अभावाला ।
सोहिरा जाणे अंतरे ॥4॥

हकनाक आयुष्य जाय । प्राण्या तूं उगाच बससी काय ॥धृ॥

मनासी मानेल तेंच तूं करिसी । देवासी जें कां नसाय ।
विचार बोलुनि करिसी तूं अवघा । हा कृत्रिम व्यवसाय -1

अति प्रीतिनें देहा पाळिसी । भिक्षुकां देसि दुराय ।
अनुतापाविण नरकी पडसी । मग हा न चले उपाय - 2

स्वदारा हा परदारा हो । भुलणें हाचि अपाय ।
भोग भोगितां रोग उठती । रक्त-पित्त कफादिक वाय -3

अनादि हा सत्य ईश्‍वर । म्हणोनि सोहिरा गाय ।
मलाहि दिसतो तुलाहि सांगतों । पुढील तरणोपाय -4

सदसद्विचार कांहीं करूं या रे
एक वेळ परम हा दुर्घट, दुस्तर भवसागर तरूं या रे - धृ.

भक्तिज्ञान वैराग्य जेणें निजबोध उपजे ह्रदया रे
संतति संपत्ति न येति कोणी निर्वाणींच्या समया रे - 1

अविद्यात्मक विकार सर्वहि समूळ जाति लया रे
जेेणे करूनि हे शीघ्रचि होइल भगवंताची दया रे - 2

नित्यानित्य विवेकें निवडा जेविं हंस सलिल पया रे
याहुनि आणिक तीर्थें न लगति तुम्हां हे काशि गया रे - 3

देह संरक्षण कैसें होइल टाकुनिया किं भया रे
म्हणे सोहिरा निजधामिं रहा निघावयाचे तया रे - 4
संसार प्राण्या थोडा रे थोडा रे
जैसा पाण्याचा बुडबुडा वेगीं सोडा रे सोडा रे - धृ.

त्रिकुटीं मन हें ओढा ब्रह्मरंध्र फोडा
विषयगोडावरली माशी तेंवी मोहपाश तोडा रे तोडा रे - 1

इंद्रियें हीं कोंडा वरि नियमांचा हा धोंडा
ठेवुनि अभिमान दवडा
दूर करोनियां आधीं विकल्प  मनिंचा मोडा रे मोडा रे - 2

सोहिरा म्हणे गाढा  नाडा पंचभूतांचा झाडा
यांतुनि हें चित्त काढा  अविनाश गुरुपद जोडा रे जोडा रे -3
प्राण्या सदां सुखी त्वां असावें - धृ.

अवचट हें निर्माण होतें याचि प्रकारें विलया जातें
सखेद होऊनि उगीच असतें तेथें कोणावरी बा रुसावें - 1

चिंता वाहतो कोण पाहतो अचल अमर येथें कोण राहतो
त्रैलोक्यपोटीं कोण साहतो स्वरूप तुला तें दिसावें - 2

प्रपंच ही मायेची माव      सुखदु:खाचे बसती घाव
एकवेळ निरंजनिं पाव        तत्व हें पंचवीसावें - 3

सोहिरा म्हणे स्वस्थ असावें मन हे संशयभूत नसावें
परब्रह्म हें ह्रदयिं ठसावें मग आनंदें स्वस्थ असावे - 4
वासना हे विषयांची बुडविल आम्हां
यास्तव तुझें स्मरण करावें सदैव आत्मारामा - धृ

पदार्थ अवघे अनुकुलल झाल्या, गर्वा चढविल आम्हां
काळें करोनि प्रतिकुळ झाल्या, फुकट रडविल आम्हां - 1

कोठिल कोण मी पाहूं जातां, मधेंचि अडविल आम्हां
जन्ममरण गर्भवासिं दुर्घट अखंड पाडिल आम्हां - 2

मृगजलवत् संसार यांतिल सुखदुख घडविल आम्हां
घडिघडि तजविज करितां चिंतेखालिंच सडविल आम्हां - 3

दृष्टी पडल्या दृश्यभास हा, मोहचि जडविल आम्हां
देहीं असोनि सर्व प्रकाशक आत्मा दडविल आम्हां - 4

म्हणे सोहिरा त्रिविध तापीं, अखंड कढविल आम्हां
मोक्षपदाचा मार्ग निरोधुनि, आंतचि तुडविल आम्हां - 5
विसरूं नको तो देव जो हरि साक्षिभूत स्वयमेव ॥धृ॥

तारुण्यकाळीं पुण्यदशेचा, होऊं पाहतो चेव
रंगरुपाला भुलूं नको तूं पहात स्त्रियांचे टेव -1

अंतकाळ हा न पवे तोंवरि भवसागर हा पेंंव
वैराग्यविवेकें संगाविरहित सदैव सुख हें सेव - 2

पराधीनता पावेल तेव्हां विस्मय पडेल भेव
स्वहच्छ असणें यास्तव घरघर भिक्षा मागुनि जेव -3

म्हणे सोहिरा त्यावांचुनि हें शरीर केवळ शेव
स्वयंप्रकाश सत्ता ज्याची चालवि हे अवयेव - 4
सद्गुरूसी हटका । आतां करा आपली सुटका ।
दृश्यभास नाश पावे । स्थीर नोहे घटका ॥धृ॥

लिंगदेह यमदूतां सापडेल अटका ।
आत्मज्ञाने उमजुनियां आधींच तुम्हीं सटका ॥1॥

करितो लीला टिेळेमाळा । प्राणि निटनेटका ।
केव्हां नेणो पाठिवरी काळ मारिल मुठका ॥2॥

भजनावांचुनि वेळ कधीं घालवुं नका लटका ।
मनीं राम मुखी नाम । करीं मार चुटका ॥3॥

सोहिरा म्हणे राहुं नका । घट जसा फुटका ।
निरंजनी पूर्णबोध प्रेम पिवा घुटका ॥4॥

श्रीहरिच्या निज लाग छंदा ॥धृ॥

उत्तमांतिल पद हें जाण सुखाधिक जें सांडुनि सकाम धंदा ॥1॥

दृश्य-विषयत्यागीं, बरवे आत्मत्त्व भोगीं; सावध स्वरूपीं हो मंदा ॥2॥

निजतेजीं साकारीं, पहिले सोहंबीज ओमकारी , निर्मूळ उत्पत्तिकरकंदा॥3॥

म्हणे सोहिरा निजरंगीं पैं रमता, केवळ स्वपद ये हाता, सवें देखसी गोविंदा ॥4॥
अशाचि खालीं गेला प्राण्या जन्म तुझा व्यर्थ
कवण मी हा कोठिल तुजला न कळे परमार्थ - धृ

अरूप आत्मा ब्रह्मस्वरूपीं नलगे लक्षांश
अनेक शास्त्राभ्यासें तुजला प्रियकर वाच्यांश
जितुकी विद्या तितुका वृत्तिचा आढळतो अंश
परतुनि दृष्टि न पाहे नाथसंकेतीं चिदंश -1

ऋद्धि सिद्धि गारुड पाहतां लाभ काय तुजला
प्रमाण मानुनि देह केवळ भुलसी धातूला
अंतरिं ज्ञानप्रवेश न होय नाशचि हा तुला
अमूक ऐसा नकळे तुजला चालक आंतुला - 2

गगनवनाचे ठायिं न होई मन हें विश्राम
संकट वाटे मोठें सोडितां इंद्रियग्राम
तीर्थें व्रतें दानधर्म हीं तितुकीं सकाम
निरालंब हें निर्गुण येणें न मिळे निजधाम -3

म्हणे सोहिरा कणासि टाकुनि उपणीसी कोंडा
आत्मज्ञानीं अनावडी जशि अवरूची तोंडा
मायानदिचा हा तुजवरती आलासे लोंढा
वाहत वाहत जाशिल तेथें प्राप्त नव्हे धोंडा - 4
ऐशी अव्यक्त हे भिंती । विश्‍वचित्राकारें मिरवती ॥1॥

अहं ब्रह्मास्मि हा चुना । काढुनि लेपें योजिलीं नाना ॥2॥

पंचभूतांचा हा रंग । भरोनि प्रकृति हें अष्टांग ॥3॥

कल्पना हे चितारिणी । करी नामासारखी रेखणी ॥4॥

लेप उपटती जाती क्षय । परि भिंती हे अक्षय ॥5॥

भिंती नाहीं आदी अंत । हाचि योग्यांचा सिद्धांत ॥6॥

सोहिरा म्हणे लेपाचा पसर । मोडिल्या भिंतीचा पडे विसर ॥7॥
तुम्हि वंदा, सकळहि साधुवृंदा, न करावी हे निंदा, सोडुनि सकळहि धंदा
संगति सद्गति पावे जीव हा अक्षय परमानंदा - धृ.

ते संत, वृत्ति ज्याचि संत, विषयांची घस्तती जे कां न करिती पसंत
जेथें जाती तेथें चित्सुखज्ञानवनींचे वसंत - 1

ते गाती, स्वरूपाचा सांगाती, देह हें जाणती माती,मिथ्या हे कुळयाती
अजरामर स्वरूपीं तद्रुप झाले हारपली दिनराती - 2

हें मन, झालें की उन्मन, होउनी इंद्रियां दमन, नाही पुनरपी आगमन
खेचरि मुद्रा लावुनि ज्यांहीं निर्गुणिं केलें गमन - 3

त्या संताला, शरण यावें त्यांला, नको मानूं भलत्याला, द्वेषी वितंडमत्याला, अपरसुखीं झुरत्याला
म्हणे सोहिरा भाषण करणें पाहुनियां पुरत्याला - 4
हरिस्मरण सुख हें जरि घे तरि मोह मनीं न रिघे - धृ

श्रवण मनन निदिध्यासें करुनि रज तम हा डाग निघे
मिथ्या मानलें सकल दृश्य हें पुनरपि नयनिं न घे - 1

येणें पुण्येंकरूनि वर्तनीं किमपि न उरति अघें
भक्तिज्ञानवैराग्यदशा हे नित्य ह्रदयिं वळवे - 2

ध्यान धरोनी निरंजनवनीं दृढाभ्यास लावुनि घे
तरि तें पद  पावेल जेथ हे ब्रह्माहरिहर तिघे - 3

म्हणे सोहिरा आत्मरसाची प्राणि नित्य चव घे
अंतरिं बाहेर तेंचि किं व्यापक ब्रह्माचि हें अवघें - 4
जगजीवनजी दीनोद्धार ॥धृ॥

आत्मानात्मविवेकसुमतिसुख दावीं सारासार
लटिकें देह हें गेह करुनि जिव भोगितसे दु:ख फार ॥1॥

मुक्त करुनियां गुप्त स्वरूपिं दे दर्शन उक्त प्रकार
विश्‍वंभर करुणाकर लवकर भवसिंधू करिं पार ॥2॥

योगयुक्ति दे शून्य मंडळीं मन हें जाऊं एकवार
भक्त काज-कल्पद्रुम सद्गुरू दाता परम उदार ॥3॥

म्हणे सोहिरा कामक्रोध मदमत्सर दानव मारुनि उतरीं भार
युगायुगीं तूं धरिसी नाना रूपीं लिळावतार ॥4॥
नाच नाचे नाचे, या हरिरंगी नाचे ॥धृ॥

सहजसमाधि लागे, निद्रेमाजी होईल जागें ।
समाधान मनाचें ॥1॥

भ्रमरगुंफे राहणे, निरंतर स्थीर होणें।
उलटें मान लोचनाचें ॥2॥

बद्धता नाही, मग मुक्तता कैंची ।
नामचि नुरे मोचनाचें ॥3॥

सोहिरा म्हणे मी नाही, मग दुजा तेथ कैंचा पाहीं ।
काज राहिलें पावनाचें ॥4॥
झाला ब्रह्मबोध लागली समाधी ॥धृ॥

सुषुम्नेच्या छिद्रीं । स्थिरावलों ब्रह्मरंध्री । भेदोनियां नादबिंद ॥1॥

मना वाचे नाकळे। ऐसें देखिलें निराळें । रूपावीण हें अगाध ॥2॥

सोहिरा म्हणे काय वानूं । हारपले देहभानू । सदृगुरू भेटला हा सिद्ध ॥3॥
हंसाचा चारा । न इच्छिसी वायस ।
आणि मेल्या मांस । भक्षितील त्याचे ॥1॥

नागसरीचें सूख दिवडा केविं कळावे ।
उंदीरचि गिळावे । त्याणें पैं गा ॥2॥

अग्निमाजी सती । एकलीच जळे ।
आणि पहावया मिळे । सकळ जन ॥3॥

तैसा कोणी न झोंबे । साधूच्या आनंदा ।
आणिक करावया निंदा । कित्येक मिळती ॥4॥

सोहिरा म्हणे यांत आमुचें काय गेलें ।
तुमचेचिं केलें पावाल तुम्ही ॥5॥
ऐसे जाणावे भक्त । तेचि योगी तेचि मुक्त ॥1॥

परा कमळ पर पराग । तेथ गुंतति जैसे भृंग ॥2॥

अनाहत नागसर चांग । तेथ जैसे कां भुजंग ॥3॥

निरंजन हेंचि गूळ । तेथ मुंगीच केवळ ॥4॥

समाधिधन निज ज्योती। तेथ पायाळचि म्हणविती ॥5॥

सोहिरा म्हणे सत्रावीचें जीवन । तेथ नि:सिम जैसे मीन ॥6॥
निज निलय निवासी जोगी हो - धृ

नित्य निरंजनिं निद्रा  चिन्मय लेउनि कानीं मुद्रा -1

अखंडित सोऽहं जप शिरिं तन्मयाचा टोप - 2

सर्व वृत्ती तांगडिया चाले पश्‍चिमे गोधडिया - 3

भक्ति-वैराग्यें वाहविली  शुद्ध सत्व ज्याची सैली - 4

अनुहात शिंगी वाजे तेणें गगनमंडळ गाजे - 5

नादबिंदू कलाज्योती अंगिं लावूनी विभूती - 6

भोगी असतां जो वितरागी सोहिरा म्हणे राजयोगी - 7
ऐसें काय मिळालें कळेना - धृ.

चारी सहा त्रैलोक्यमंडळ
शमदमिं पाहतां कोठेंचि हें आढळेना - 1

जें जें दिसे तें नयेचि सरिसें
कर्ताचि नासे वरि अनारिसें
तें कवणाचि हें तुळेना - 2

मन निर्मळ म्हणे कल्पनाचि मळवी
आपण हे मळेना - 3

संसारभयें भितें मनचि पळवी
आपण हें पळेना - 4

अनुभव-तरुवरि फुलेंविण फळलें
देठाविण फळ कदाचि हें गळेना - 5

जें जें दिसतें तें तें त्यानेंचि चळे
परि आपण हें चळेना - 6

निखिल चिन्मयबोध मुराला
प्रकाश उरला अढळ हा ढळेना - 7

सोहिरा म्हणे मज हें घडलें
थक्कचि पडलें मन हें जडलें फिरोनि कीं वळेना - 8
भ्रम विस्मय गेला
देवें उद्वार हा केला - धृ.

अजरामर हें स्वरूप दावी
अनन्य भावें भक्ती लावी
महिमा तेची वदनीं गावी
कितुकी वचनीं ते सांगावी
जन्मोजन्मीं हे मागावी
परतुनि दृष्टीनें उमगावी
सज्जन जन मन रंजन
करि भवभंजन निरंजन निर्गुण
जो गंजन करि हरि व्यंजन
नयनीं अंजन भरि जीव
तन्मय होउनि ठेला -1

निरालंबीं राहणें ज्याला
मिळुनियां अजाला
कीं त्या भुवनत्रय राजाला
करि तो अनाहत बाजाला
विसरे तुझ्या माझ्याला
ऐसा लाल होउनी काल
कलित कौतूहल तुंदिल
ललित दलित विश्‍वंभरभजनीं
गलित वलित अतिमन होउनि
चिन्मयभुवनीं न्हेला - 2

म्हणे सोहिरा शरीरचर्म
आहे तोंवरि घडतें कर्म
पूर्वार्जित हे धर्माधर्म
अंतरसाक्ष हें जाणुनि वर्म
तेणें हरिले सकळ श्रम
ऐके देखे स्पर्शे चाखे
परिमळ ये तो घेतो नाकें
वाचे बोले हात हाले
पायीं चाले मैथुन काले
विसर्जताले
जागृति निद्रा स्वप्न सुषुप्ति
वर्तुनि ऐसा गुणातीत तो
महाशून्य चैतन्यचि झाला
जिताचि असतां मेला - 3
मन मग्न केलें गुरूनाथें - धृ.

स्वरूप कळलें, मीपण गळलें ।
मिळलें आनंदातें - 1

सहज पिसावलें, मुळीं विसावलें ।
पावलें मोक्षपदातें - 2

शून्य जितलें, निर्गुणीं रुतलें ।
गुंतलें निजछंदातें - 3

म्हणे सोहिरा सुलीन, होउनी तल्लीन झालें ।
अनाहतनादातें - 4
मोहिलें आजी मनचि तेणें हो ! - धृ.

कळोनि नकळतें । मीपण गळतें !
विश्‍व चळतें हें ज्याणें हो - 1

नाही रूपरेख । गुप्त व्यापक देख ।
ऐसा कवण म्यां नेणें हो - 2

सोहिरा म्हणे देह । गमलें नि:संदेह ।
जैसें वाटेचें पेणें हो -3
सद्गुरूकृपेचें हें देणें  समाधान केले तेणें - धृ.

पावविलें ऐसें खुणें  जेथ नाही जाणें येणें - 1

सुखें सुखांतचि लोळणें प्रेम नयेचि बोलणें - 2

निका तुटला भेदाभेद  जाहला सहज आनंद - 3

विकासलें निरंजन उन्मीळले हे लोचन - 4

मना नाहीं हो संचार ऐसें अगम्य अगोचर - 5

नामरूप न हीं ज्याला  ऐसा गैबची कीं झाला - 6

मज बैसविलें स्वस्थ  जेथें उदो नाहीं अस्त - 7

पडे मेघाविण पाऊस चांदणियाविण प्रकाश - 8

हें परमामृत पारणे मज झालें सोहिरा म्हणे - 9
ह्रदयीं चिन्मयसुखाचा बोध जाहला - धृ.

कांहीं नाहीं प्रतिकूळ । जाहलें स्वरूप अनुकूल । जया याति नाहीं कूळ ।
पाहतां आपुलें तें मूळ । समूळ हा शब्द निमाला - 1

होउनि अहं-सोहं भग्न । जाहलें तद्रुपतेशीं लग्न ।सदां स्वयेंचि संलग्न ।
आपण अंतरींच मग्न । होउनि पूर्णानंदें धाला - 2

कीं तें नामरूपावीण । निरालंब हें निर्गुण । घेतां तेथिल हे खूण ।
गेलें व्यापें व्यापकपण । केवळ जाहलें उगवण । कीं या अनादिबीजाला - 3

सोहिरा म्हणे ज्ञेय । ज्ञाता झाले ब्रह्ममय । अविनाश अप्रमेय ।
अखंडित निरामय । कीं हें सद्गुरूचें गुह्य । की अद्वयअम्मल प्याला - 4
तरि अघटित हें घडलें चित्त स्वरूपीं जडलें - धृ.

क्रोध - शांतिरूपें एक होउनि
व्याघ्रधेनुशीं जहीं सख्य पडलें - 1

ममता भास अदृश्यिं मिळोनि
गरुडपिच्छांवरि व्याळ क्रीडलें  - 2

लोभ मतंगज पंचपंचाननिं
भेटोनि खेंव दिधलें - 3

पूर्ण जळामधिं काष्ठ हुताशीं
पां ! हे प्रज्वळलें - 4

सोहिरा निज महितळिं राहोनी
रविचंद्र आकळिले - 5
तुजविण आणिक नाही रे मज
कळोनि आलें हें आजि सहज ॥धृ॥

अनेकरूपी एका 
नगर नायका -1

अलख निरंजना
 दत्त चिद्घना - 2

जगदखिलपालना 
हे लीलालालना - 3

भक्तजनतत्परा 
प्रेमपरात्परा - 4

जय जया विशुद्धा
देवा अनादिसिद्धा - 5

सदय ह्रद्नता 
ह्रदयनिवासिता - 6

दिसे तें पावेल अस्तु
तूं अविनाश वस्तु - 7

जगनगनगरा
हे करुणासागरा - 8


सुख नाहीं हो कोठें
संसारी दु:ख मोठें - 9

किती वोखूं हें कूड
प्रत्यक्ष लांकूड - 10

देह हे जायांचे
अंतीं हें जायाचें - 11

जळो परतें हें पोट
आणि जळो तें चिरगूट - 12

मासा करी चळवळ
परि केधवां नेणों पडेल जाळ - 13

संसारिया सुख तैसें
केव्हां नेंणो नेसिल कैसें - 14

विषयसुखीं अनावडी
लागो तुझी पुरती गोडी - 15

सोहिरा म्हणे मागतसों
बोलासारिखें आंगी असों - 16
देशिल जरि तरि हें देणें - धृ.

मीपण मावळे, दिठी पुंजाळे, कल्पना गळे, जग जळे हें तेणें - 1

विषयां वेगळें सुख, ‘नाहीं रूप रेख’, सहज समाधान होय जेणें -2

जळीं मिळालें लवण, जळचि झालें तेवीं, मनासि नाहीं येणें - 3

सोहिरा म्हणे जया, काया नाहीं माया, पवन गगनीं लयासि नेणें - 4
ऐसी करीं हो ! दया । परतोनि मन न धरी, या देहाची माया - धृ.

कवणे काया कवण गेलें । कवणें काय भेटविलें ।
अवचटेंची काय झालें । उमज ना जया - 1

पाहों जातां जया आदि । अंतीं लागली समाधि ।
गेलियाची नाहीं शुद्धि । आपुलिया ठाया - 2

मी मजला पावुनि । स्थिर तेथें राहुनि ।
कल्पनाहि जाय जंव । आपआपें लया -3

सोहिरा म्हणे निरामया । झालीच ना हेचि काया ।
मिठि पडली चिन्मयासी । मिनली तन्मया - 4
पाव ज्ञान दाव ध्यान लाविं या मना - धृ

याच देहीं याच डोळां मुक्तिचा सोहळा ।
भोग राजयोग वश करोनि सांडी कामना - 1

दिसतें तें हें नासतें कीं हें । अविनाश असतें कीं हे ।
वसतें तुझे ह्रदयीं असोनी । तुजला फाम ना -2

सद्गुरूसी शरण जावें हम्मेशा भजावें ।
निज गुज हें बुझावें जावें होउनि गगन गा मना !।

सोहिरा म्हणे आहे नाहीं पाहीं तूं सबाह्य ब्रह्म ।
आद्यंत अनंतरूप निजधाम ना ? - 3

सार्थक माझें हें करिं तूं ॥धृ॥

अच्युत केशव परमानंदा गोविंदा ये मुकुंदा
कायासुमनांतील मकरंदा जगद्व्यापका श्रीहरि तूं - 1

ज्ञानसूख या अमला पाजुनि   मजला पूर्ण समाधी लावुनि
अद्वयकमला विकास करूनीं मोहांतुनि उद्धरिं तूं - 2

लय हें लागो हेंचि मागों चित्तचि हें वितरागो
नित्यनिरंजनिं जागो मनिंचा जाउं नये क्षणभरि तूं - 3

म्हणे सोहिरा पापपुण्य दोनी घडति कर्मबीजापासोनी
बीजचि कीं तें नासुनि मजवरि कृपा करीं लवकरि तूं - 4
करिं करूणा जगदाभरणा प्रेम निरंत ॥धृ॥

एक बहुपणें साम्य समावत
गुणिं असोनि गुणातीत - 1

बंदिन मानसें भलतशा मिषें
देखें स्वरूप रूपातीत - 2

करणि करूनियां जाइल वायां
जाणोनियां मग नेणत - 3

मागील पुढील कांहींच नाहीं
सोहिरा देहींच देहातीत - 4
ऐसा जन्म नको हा मला । देवा, शरण येतों मी तुला ॥धृ.॥

देह हें जाण जिवाला मोट । बांधुनि केलासे कडेलोट।
तेथ श्रमतों भरतां पोट । दु:खें भोगिलीं कोटिनकोट ॥1॥

जन्मांतरिंचे पुण्यपाप । प्राप्त जाहले त्रिविध ताप ।
आयुष्याचें भरतें माप । डोळां पडलि मोहाचि झोंप ॥2॥

आपण पडला असता बंदी। आणिक लोकालाही निंदी।
दुष्ट दुरात्मा हा द्वंद्वधी । करोनि होत समंधी ॥ 3॥

ज्याला सुचेनाची सुटका । धरितो अभिमान हा लटका ।
अडला देहबुद्धिच्या अटका । ईश्‍वर स्मरेना एक घटका ॥4॥

न रूचे संतांची सोबत । पाठी धावेना लोंबत।
नाहीं योगाला झोंबत । नायके अनाहत नौबत ॥5॥

सोहिरा म्हणे यांतुनि सोडीं। आवरीं मानसाच्या ओढी ।
दहाही इंद्रियांतें कोंडी। लावीं आत्मस्वरूपीं गोडी ॥6॥
वासना हे विषयांची बुडविल आम्हां ।
यास्तव तुझें स्मरण करावें सदैव परब्रह्मा ॥धृ॥

पदार्थ अवघे अनुकूल झाल्या, गर्वा चढविल आम्हां।
काळें करोनि प्रतिकूल झाल्या फुकट रडविल आम्हां ॥1॥

कोठील कोण मी पाहूं जातां, मध्येंचि अडविल आम्हां।
जन्ममरण या दुर्घट र्गभवाशीं, अखंड पाडिल आम्हां ॥2॥

मृगजलवत संसार यांतील, सुखदु:ख घडविल आम्हां।
घडी घडी तजविज करितां चितेंखालिंच सडविल आम्हां ॥3॥

दृष्टी पडल्या दृश्य भास हा, मोहचि जडविल आम्हां ।
देहीं असोनि सर्व प्रकाशक आत्मा दडविल आम्हां॥4॥

म्हणे सोहिरा त्रिविधतापीं अखंड कढविल आम्हां।
मोक्षपदाचा मार्ग निरोधुनि, आंतचि तुडविल आम्हा ॥5॥
अवटेंचि आजि ऐशी गुरुकृपा हे फळली ।
आपुलें स्वरूप पाहतां कल्पनाचि हे गळाली ।
अनुुभवतेजामाजां देहबुद्धि हे जळाली ।
निरंजनीं दीपवाळीची दीपमाळी पुंजाळिली ॥1॥

ज्ञानदिंडी पाहूं जातां झाला संसारचि लटका ।
सत्तारूप कळों आलें आलें तंव तंव यत्नातुनि सुटका ।
बंधाची तो दोरी तुटली तंव झाली कीं हे सुटका ।
गैबचि हा प्याला प्यालों पूर्ण प्रेमाचा घुटका ॥2॥

इंद्रियें ही ं शोधूं गेलों तंव हरपली साक्ष ।
अधोर्ध्व टाकिंता हें मौन आलें कीं प्रत्यक्ष ।
विहंगम उडों गेला तंव मोडले पक्ष ।
असो कीं हें देह नसो सोहिरा झाला अलक्ष ॥3॥

काय  झालें तें नयेचि सांगूं । अंतरींच भोगूं - धृ.

धृतीचा हा डोळा, असतांचि, कल्पना बाहुली हे परतली ।
चालतां राहिली चालचि, वाचा बोलतां निमाली - 1

पुढिलें हें थोकलें योजना मोडली आठवण मागली ।
दृश्य  द्रष्टा मनीं न गणितां, मीपण दोरीच हे काढिली -2

सोहिरा म्हणे आतां हारपली मुद्रा, सहजेंचि निद्रा उन्मनी लागली -3
आरंभ रंभ:स्तंभ निरालंब स्वयंभचि झालों - धृ.

मूळ आलें हातां पाहतां पाहतां, आंतचि निमालों ।
सोऽहंबीज, निजगुज । बुझोनियां ठेलों - 1

संगचि सोडी, आत्मा आवडी, झाली हे जोडी ।
मनाच्या ओढी, अनेक मोडी, लागलि हे गोडी - 2

सोहिरा म्हणे सये तन्मय, मुरलें उरलें चिन्मय ।
आपणा गांठी, पडली मिठी, दिठी परतोनि नये - 3
जगीं तूं धन्य एक ॥धृ॥

देहपण विषयांसी आभारिलें ।
रिसी ययांशी वेगळिक ॥1॥

सारासार हें जाणुनिया निकें ।
न धरिसी हा भवशोक ॥2॥।

सोहिरा म्हणे मग नाहीं जन्ममरण ।
काय सांगों अलौकिक ॥3॥
तरी अघटित हें घडलें । चित्त स्वरूपीं जडलें - धृ.

क्रोध-शांतिरूपें एक होउनि । व्याघ्रधेनूशीं जहीं सख्य पडलें - 1

ममताभास अदृश्यीं मिलोनि । गरुडपिच्छांवरि व्याळ क्रिडलें - 2

लोभ मतंगज पंचपंचाननीं । भेटोनि खेंव दिधलें - 3

पूर्ण जळामध्यें काष्ठ हुताशीं । पां ! हें प्रज्वळलें - 4

सोहिरा निजमहितळीं राहोनी । रवि-चंद्र आकळिले - 5
छंद लागला हो अखंड श्री नाथजीचा ॥धृ॥

सहज हरिख जेथ नाहीं रुपरेख । तो हा देख गोरखनाथजीचा ॥1॥

मनमोहन गहन सज्जनरंजन । अलख निरंजनजीचा ॥2॥

नि:संग निष्काम कल्पद्रुम हा आराम । सहज आत्माराम नाथजीचा ॥3॥

सोहिरा म्हणे भोगी ना त्यागी अनाहत शिंगी । विराजे राजयोगी जोगी नाथजीचा ॥4॥
तरि देवचि होईल प्राणी । जें कां शाश्‍वत ध्यानीं आणी ॥ धृ॥

विहंगम हा आकाशीं पाखाणी दृष्टिसी सृष्टि दिसे हे उखाणीं ॥1॥

वाणी टाकील ओंगळवाणी ।
नामसुधारलें रंगली वाणी ।
ऐकतांचि हे कौतुकवाणी ।
पावें निरंजन निर्वाणी ॥2॥


होईल प्रसिद्ध शास्त्रपुराणीं ।
निजकळा अनादि पुराणीं केली विकारचुराणी।
सोहिरा म्हणें प्रकटे तूर्याराणी ॥3॥
प्राणी हो सदां सुखी रहा - धृ.

स्थूलदेह हे कोठुनि चाले, कवण यांतुनि बोले ।
विषयसुखांत कोण डोले, द्रष्टा कोण कसा मी पहा -1

पंचभूतसंयोगें सकळिक, सुखदु:ख हें सहा ।
जीव होत्साता शिवरूप मी, कधीं सोडूं नको धीर हा - 2

म्हणे सोहिरा बुद्धियोगें हीं इंद्रियें आकळी दाहा ।
सहजसमाधींत निमग्न होउनि, म्हणोनि घ्या तुम्हि अहा - 3
साधु या प्रकारचे हो प्राणी तूं ध्यानीं आणी
दृश्यभासाला दृष्टीं नाणीं
ज्याचे पिंडीं नांदते तूर्याराणी जाणा हो जाणा - धृ

अद्वैताचें भजन करीत  हा लाभ त्वरीत
घेउनि बैसति आनंदभरीत
सहज समाधि-वनितेला वरीत जाणा हो जाणा - 1

जन्मा येउनि परम दक्ष  साधिति मोक्ष
लाविती निरंजनिं लक्ष
सकळ व्यापक स्वरूप हें अलक्ष जाणा हो जाणा - 2

केवल संतोषाचे गोळे ह्रदयिंचे भोळे
मन हें प्रेमामाजी लोळे
लागती ज्यांचे परब्रह्मी डोळे जाणा हो जाणा - 3

टाकुनि इतर सकळ धंदा लागती छंदा
भेदुनि गेले हो नादबिंदा
जाउनि मिळाले जगदादिकंदा जाणा हो जाणा - 4

जें जें समयीं घडलें साहती  पाहण्याला पाहती
निजींचा निदिध्यास वाहती
अखंडित जे निरालंबी राहती जाणा हो जाणा - 5

सोहिरा म्हणे हो त्यांचे तोडी नाहीं दुसरी जोडी
त्यांची त्यांनाच ठावी गोडी
परमामृतसागरीं दिधली बुडी जाणा हो जाणा - 6
संत जातीचे सर्वांसी अद्वेषी
हकनक त्यांला हे सर्वहि जन कीं द्वेषी
वरतीं दाविती गवलता हे देशी
त्यांच्या सन्मानें परम होती क्लेशी - धृ.

गायी हिंदूंसी परम पूज्यमान
देखुनि दुश्‍चित्त मनिं हे मुसलमान
खाउनि दुभतें कीं निदानिं हे बेइमान
सुंदर वनितेचा कामि पुरुष दुस्मान -  1

वृक्ष आहे कां उगाचि अपुले ठायीं
वाटेन जातो तो मौजेन घाली घायी
तो तंव कोणाचें काहिंच खात नाहीं
अन्यायाविणें घडती हे अपायी - 2

चंद्रोदयीं कीं समस्त सुखी होती
तस्कर देखोनी परम दु:खी चित्तीं
अस्त व्हावा हें सतत ह्रदयीं चिंती
निंदक जनांसी साधुची तैसी खंती-3

हंस सेवितो सहज मुक्ताफळें
स्वाद कैसा तो नेणती कावळे
त्यांच्या अंगीचें जरि कां मांस मिळे
मूर्ख साधूंच्या लांछनिं देती डोळे - 4

ज्याणें साधूंची संगती धरावी
त्याणें आधींच पुरती पारख घ्यावी
जिविंची खूण हे जातिनिशीं समजावी
परतुनि सोहिरा म्हणे प्रीत विटों न द्यावी - 5
गुरूजी जोशी ऑलख ऑलख आलख जागे रे - धृ

विरक्तरंगें ज्ञानगंगे स्थान तृप्त वैराग्यें, विभूति अंगें
निपट नागे रे ! नागे रे ! नागे रे - 1

संसार न ठावा  शून्य विसावा रूप,
अभावाचा रिघावा, नाहीं अनावा, गोसांवी मौनि
बावा रे ! बावा रे ! बावा रे !- 2

आनंद छोटा, प्रेमाच्या जटा, त्रिवेणी वाटा,
निघे गोल्हाटा, अवधूत मोठा रे ! मोठा रे ! मोठा रे ! - 3

वीतरागी अनुरागी, भोगी ना त्यागी, अंतरीं नि:संगी,
विराजे राजयोगी रे ! योगी रे ! योगी रे ! - 4

सोहिरा म्हणे या अंधाला , न पाहतां गेला, उर्ध्वपंथें आला,
प्रेमपुरीं न्हाला, जीवनकळा बीज प्याला रे ! प्याला रे ! प्याला रे ! - 5
आरंभ रंभ:स्तंभ निरालंब स्वयंभचि झालों - धृ.

मूळ आलें हातां पाहतां पाहतां, आंतचि निमालों ।
सोऽहंबीज, निजगुज । बुझोनियां ठेलों - 1

संगचि सोडी, आत्मा आवडी, झाली हे जोडी ।
मनाच्या ओढी, अनेक मोडी, लागलि हे गोडी - 2

सोहिरा म्हणे सये तन्मय, मुरलें उरलें चिन्मय ।
आपणा गांठी, पडली मिठी, दिठी परतोनि नये - 3
हें लाधलें सहजमौन्य । कीं शून्यामाजी गेलें शून्य - धृ.

जीवशिवभेदाचें दैन्य । फिटोनि प्रकाशलें चैतन्य - 1

निरालंब हें गगन । शेजे घातलें उन्मन - 2

सोहिरा म्हणे केलें शयन । जेथें न पावती नयन - 3
काय मिळालें हें नयेचि तुका । झालों म्यां मुका - धृ.

ॐकार कुंठला, शब्द मावळला ।
न बोलवे अमुका - 1

बुद्धि विहंगिणी, संसार तरुवरि ।
उडों जातां समूळ मोडला डोका -2

साधन नौका, नलगे तो रूका ।
सांपडलें फुका -3

सोहिरा म्हणे भ्रांतितिमिर दवडुनी ।
तन्मय उजळुनी चिन्मयदीपिका - 4
रामरूप झाले प्राणी - धृ
.
अंतरीं दीपक उजळला । मी कोण कळला ।
अभिमान गळला । मिळोनि गेले निर्वाणीं - 1

निरंजनाला, आणि मनाला ।
जशी भेट होउनी लवणाला । रिघालें पाणी -2

मिळोनि आकाश, आणि सुप्रकाश ।
श्‍वासोच्छ्वास राहिला प्राणीं - 3

म्हणे सोहिरा आपण तरणें, जग उद्धरणें ।
निघती भगवद्वाणी - 4
ज्ञानगंगातीरवासी बैरागी - धृ

हांसत खेळत डोलत बोलत नित्य बैरागी ।
तन्मयबीजा सेउनि सहजा रंगे निजरंगीं - 1

चिन्मय गोपीचंदन नामें उजळी सर्वांगीं ।
बोधकमंडलु दंडविवेक त्रिवेणीमार्गीं - 2

चालत चालत पश्मिमपंथीं मध्यमा सुरंगीं ।
भोगुनि त्यागी जो वितरागी सोहिरा म्हणे राजयोगी - 3
अरे ! सज्जन होउनी विजन देखें -धृ.

विषयमदादिक पोळुनि आघवे । जेथ सदाशिव तोखे -1

अनात्मक हें सकळहि आटुनि । अभेदनगीं उमा उखे -2

शंखध्वनि हे अनुदिनीं वाजत । नारि भुलत निजसुखें -3

सोहिरा म्हणे तें स्थान पाहे तो । पुनरागमनासि नोळखे - 4
हें लाधलें सहजमौन्य । कीं शून्यामाजी गेलें शून्य - धृ.

जीवशिवभेदाचें दैन्य । फिटोनि प्रकाशलें चैतन्य - 1

निरालंब हें गगन । शेजे घातलें उन्मन - 2

सोहिरा म्हणे केलें शयन । जेथें न पावती नयन - 3
ऐशी अव्यक्त हे भिंती । विश्‍वचित्राकारें मिरवती -1

‘अहं ब्रह्मास्मि’ हा चुना । काढुनि लेपें योजिलीं नाना -2

पंचभूतांचा हा रंग । भरोनि प्रकृति हें अष्टांग -3

कल्पना हे चितारिणी । करी नामासारिखी रेखणी -4

लेप उपटती जाती क्षय । परि भिंती हे अक्षय -5

 भिंती नाहीं आदि अंत । हाचि योग्यांचा सिद्धांत -6

सोहिरा म्हणे लेपाचा पसर । मोडिल्या भिंतीचा पडे विसर -7
कांहीं बोलावेंसें नाहीं । रूप डोळ्यांवीण पाहीं -1

वाचेवीण बोलणें । जेथ पायावीण चालणें -2

कानेवीण घेतों साद । जिव्हेवीण चाखें स्वाद -3

त्वचेवीण घेतों स्पर्श । भोगीं चित्तावीण हर्ष -4

नासिकावीण वास । पडे मेघावीण पाऊस -5

सोहिरा म्हणे इये खुणे । एक अनुभविया जाणे - 6
लागला निदिध्यास अविनाशसुखाचा - धृ.

निराकार निर्गुण निरंजन निरामयाचा - 1

धन्य हें मौन्य, महाशून्य चैतन्य अखंडिताचा - 2

ज्ञान निरवधि, सहजसमाधी, सकळकळानिधीचा - 3

कलिमलदहन, गहन मनमोहन, दयार्णवाचा - 4

कायादंडन, नलगे मुंडन, नलगे रूका हा सदा फुकाचा - 5

निष्काम आराम, हा राम, कल्पद्रुमाचा - 6

दुमदुमिलें अंबर, स्थिरावली नजर, होता हे गजर,  अनाहतध्वनींचा - 7

म्हणे सोहिरा दास उदास, हा छंद सदा सच्चिदानंदाचा - 8

दिसणें हे सरलें अवघें प्राक्तन हें मुरलें - धृ.

आलों नाही गेलों नाही मध्यें दिसणें हे भ्रांती
जागृत होतां स्वप्नचि  हरपे कर्पुर न्यायें जग हरलें - 1

दिसणें हाचि जन्म योगियां ना दिसणें हा मृत्यु म्हणा
गैबिप्रसादें गैबचि झालें आप आपणामधिं लपलें - 2

मछिंदर गोरख जालंदर हे न्याया आले स्वस्वरूपीं
जातां जातां गमनग्राम तें समूळ कोठें ना गमलें - 3

म्हणे सोहिरा सत्रा चौदा मधुमासाच्या नवम दिनीं
सगुणस्वरूपीं निर्गुण ठेलें अनुभव हरले स्वरूप कळे - 4