ऐसा जन्म नको हा मला । देवा, शरण येतों मी तुला ॥धृ.॥

देह हें जाण जिवाला मोट । बांधुनि केलासे कडेलोट।
तेथ श्रमतों भरतां पोट । दु:खें भोगिलीं कोटिनकोट ॥1॥

जन्मांतरिंचे पुण्यपाप । प्राप्त जाहले त्रिविध ताप ।
आयुष्याचें भरतें माप । डोळां पडलि मोहाचि झोंप ॥2॥

आपण पडला असता बंदी। आणिक लोकालाही निंदी।
दुष्ट दुरात्मा हा द्वंद्वधी । करोनि होत समंधी ॥ 3॥

ज्याला सुचेनाची सुटका । धरितो अभिमान हा लटका ।
अडला देहबुद्धिच्या अटका । ईश्‍वर स्मरेना एक घटका ॥4॥

न रूचे संतांची सोबत । पाठी धावेना लोंबत।
नाहीं योगाला झोंबत । नायके अनाहत नौबत ॥5॥

सोहिरा म्हणे यांतुनि सोडीं। आवरीं मानसाच्या ओढी ।
दहाही इंद्रियांतें कोंडी। लावीं आत्मस्वरूपीं गोडी ॥6॥