अरे तूं धरूं नको, धरूं नको, लटिका हा अभिमान
शाश्‍वत नाहीं रे संसारीं, देहा कोण जुमान
जेथुनि आलासी जन्माला, तेथ घरीं इमान
सहसा होउं नको, होउं नको भगवन्तीं बेइमान - धृ.

हें तूं जाण रे सुजाणा, दो दिवसांचे बखत
आयुष्य कितुकें हें कळेना, कसा येतसे वखत
कांहीं गुरूमुखें समजुनि घे पाव निरंजन तखत्
याला दिरंग तूं करूं नको शेवटिं पडशिल फकत - 1

पुरता पहावा तनुचा चालक कोठें
सहसा नयेचि रे दाखवितां हा म्हणुनिया बोटें
रूपरेखेविणें देखे अगोचर हेंची गूढ मोठें - 2

सावध करितां रे घरबार  भजनाचा करभार
देउनि सोडुं नको दरबार मुळिंचा वारंवार - 3

स्वरूपसागरिंचे तरंग विचित्र नाना रंग
आवरि पवनाचा तुरंग अंबरिं चाल तूं अंतरंग - 4

गुप्त हे सत्ता कैसी तरज करुनि कामक्रोध हे वर्ज
करणें देवापाशीं अर्ज, ठेवुं नको जनाशीं गरज- 5

नको साधुंचि हे हरकत ययातें नाहिंच रे बरखत
निंद्यवादाचें बहुखत पुनर्बधिर मुका जन्मत - 6

आतां जीवत्व हें उद्वारीं चित्त देईं जगदुद्वारीं
चित्त देउं नको आकारीं सतत रम तूं निराकारीं - 7

सांडीं विषयांचा विलाप अवघा कर्मक्रियाकलाप
भगवद् गुणानुवाद आलाप महदानंदीं होई मिलाफ - 8

भव हा दोराचा रे साप कवणा असे पुण्यपाप
भ्रांति व्हावी हे नि:पाप अरुपीं मिळोनि आपोआप - 9

भेदुनि त्रिवेणिचा संगम अद्भुत मन हा सारेगम
सहस्त्रदळीं पावावा सुगम खरा मार्ग हा विहंगम - 10

जेथ वेदाद्य न चलति तर्क तेथ मावळले चंद्रार्क
महा अद्वेत पिउनियां अर्क सोहिरा म्हणे हो गर्क - 11