लय हें भगवंतीं जरि लाय । मग हा प्रपंच केला तरि काय - धृ.

जैसी अभ्रींची हे छाया । कीं हे जाण नटाची जाया ।
अथवा मृगजळवत् हे माया । तैसी वाटत ज्याला काया ।
अवघेंचि मिथ्या दिसलें होय - 1

देहबुद्धि येतां भ्रांति । ह्रदयीं न धरे होते वांती ।
स्वस्थ बैसुनियां एकांतीं । कवण मी आहें आदीं अंतीं ।
ऐसें अखंड पाहत जाय -2

जैसे जाण सतीचे भोग । तैसें वर वर दिसतें सोंग ।
अंतरिं जीवशिवाला योग । नासुनि गेलासे भवरोग ।
मोह हा मनचाची मनीं खाय - 3

नयनीं नयेचि दृश्याभास । समूळ तुटला आशापाश ।
समग्र विकासलें आकाश । चंद्रसुर्यावीण प्रकाश ।
चित्त हे महाशून्यीं स्थिर होय - 4

झाला प्रसन्न हा गुरूराय । चुकवी जो कां भवरणघाय ।
त्याचे कधीं न सोडीं पाय । त्याला तनु मन घन हें वाय।
जो कां नित्य निरंजनीं धाय - 5

सोहिरा म्हणे सर्व समाय । विपरित गेले सर्व अपाय ।
हाता आला तरणोपाय । पिंडब्रह्मांडीं न माय ।
जन्म-मृत्यु-जरा अपाय । याचा कळला तरणोपाय ।
आंगीं आहे पुरती कमाय - 6