तुम्हि वंदा, सकळहि साधुवृंदा, न करावी हे निंदा, सोडुनि सकळहि धंदा
संगति सद्गति पावे जीव हा अक्षय परमानंदा - धृ.

ते संत, वृत्ति ज्याचि संत, विषयांची घस्तती जे कां न करिती पसंत
जेथें जाती तेथें चित्सुखज्ञानवनींचे वसंत - 1

ते गाती, स्वरूपाचा सांगाती, देह हें जाणती माती,मिथ्या हे कुळयाती
अजरामर स्वरूपीं तद्रुप झाले हारपली दिनराती - 2

हें मन, झालें की उन्मन, होउनी इंद्रियां दमन, नाही पुनरपी आगमन
खेचरि मुद्रा लावुनि ज्यांहीं निर्गुणिं केलें गमन - 3

त्या संताला, शरण यावें त्यांला, नको मानूं भलत्याला, द्वेषी वितंडमत्याला, अपरसुखीं झुरत्याला
म्हणे सोहिरा भाषण करणें पाहुनियां पुरत्याला - 4