अशाचि खालीं गेला प्राण्या जन्म तुझा व्यर्थ
कवण मी हा कोठिल तुजला न कळे परमार्थ - धृ

अरूप आत्मा ब्रह्मस्वरूपीं नलगे लक्षांश
अनेक शास्त्राभ्यासें तुजला प्रियकर वाच्यांश
जितुकी विद्या तितुका वृत्तिचा आढळतो अंश
परतुनि दृष्टि न पाहे नाथसंकेतीं चिदंश -1

ऋद्धि सिद्धि गारुड पाहतां लाभ काय तुजला
प्रमाण मानुनि देह केवळ भुलसी धातूला
अंतरिं ज्ञानप्रवेश न होय नाशचि हा तुला
अमूक ऐसा नकळे तुजला चालक आंतुला - 2

गगनवनाचे ठायिं न होई मन हें विश्राम
संकट वाटे मोठें सोडितां इंद्रियग्राम
तीर्थें व्रतें दानधर्म हीं तितुकीं सकाम
निरालंब हें निर्गुण येणें न मिळे निजधाम -3

म्हणे सोहिरा कणासि टाकुनि उपणीसी कोंडा
आत्मज्ञानीं अनावडी जशि अवरूची तोंडा
मायानदिचा हा तुजवरती आलासे लोंढा
वाहत वाहत जाशिल तेथें प्राप्त नव्हे धोंडा - 4