पतितपावन दीनदयाघन करुणाकर देवा ।
श्रवणमनननिदिध्यासें निरंतर घडो तुझी सेवा ॥धृ॥

परमप्रकाशक तेजोमय हें गुप्त तुझें स्वरूप ।
परतुनि दृष्टि पाहणें पाहता निर्गुण हें अरूप ।
परमार्थ परिपूर्ण साधनी भरलें हें अमुप ।
परात्पर तूं अंतरसाक्षी ह्रदयभुवनदीप ॥1॥

तीन्ही संधी साधुनि घेणें सुख हें एकांतीं।
तीन्ही गुण हे निरसुनि शून्यीं उगवली हे ज्योती।
तीक्ष्ण ज्ञानें पुरतें पाहता कुळ नाही याती ।
तितुकी प्रतीति बाणलिया मग दिवस नाहीं राती ॥2॥

तलगत तलगत सकळहि जीव हे चित्सिंधू आंत।
तरंग जैसे उमटत भासत नासत हे बहुत ।
तरणोपाय सांगति साधू मत हे सिद्धांत ।
तरले येणे मार्गें बहुत देहीं देहातीत ॥3॥

पान्हा पिऊनी प्रेमकळेचा हरिलें संकल्पा ।
पाहतां पारापरेनें भवभय दोरीच्या सापा ।
पारंगत हे करूनि सकळही अहं सोहं कापा ।
पारख करितां तटस्थ जाहल्या नेत्रांच्या मलपा ॥4॥

वरिली शांति आंगी जाहला पूर्ण अनुभव ।
वरदबळें सद्गुरूप्रसादें अक्षय वैभव ।
वमिलें सकळहि मायिक आतां नाही भय भव ।
वदली वाणी मौनपणी हे रूप नाही नांव ॥5॥

नम्र होऊनि वृत्ति लागली अलक्ष हे लग्न ।
नटत नटत हे  लोक सकळ ही होऊनियां भग्न ।
नख नलगे जेथे देहबुद्धिचे विकासलें गगन ।
नमुनि सोहिरा म्हणेचि अवघा अलख निरंजन ॥6॥