कवण कवणाचे नये हो संगातीं - धृ.

माता पिता बहिणी बंधु । दारासुत वृथाचि वेधु।
जाण हा स्वप्नींचा आनंदु। ममतापाशीं लाविती गोंदु।
तुझा परिणाम नसे त्यांच्या हातीं - 1

संसारी तुझे मन हें विकळे। परि मी कोण हें तुजला न कळे।
विषयविलासीं झांकुनि डोळे ।चंद्रोदयिंचे जसे कावळे।
शेवटी तुजला काय मिळेल पहा, मातिसी मिळेल या माती - 2

म्हणे सोहिरा संतसमागम। सुगम करोनि निजउगम।
चित्सागरीं मिळे त्रिवेणीसंगम। जयाला वर्णितां आगम निगम।
कुंठित जये भुवनीं तो दीपक लावीं निर्वातीं - 3