मी कोण कोठुनि आलों या शरिरीं हें स्मरण धरा रे - धृ.

कवण कर्म हें केलें । नरदेह कशानें प्राप्त जाहलें ।
सुखदु:ख हें कळुनि आलें । कैसें हाचि विचार करा रे - 1

स्थूलसूक्ष्म पंचभुतांचें । मिथ्या अवघें परि दिसतें साचें ।
लाघव सकळिक संसाराचें । सत्वर यांतुनि कडे सरा रे - 2

ज्ञानाचा अभ्यास करा । निजवस्तूतें ध्यानिं धरा ।
ध्यानें सर्वहि त्याग करा । मग निर्गुण नित्यानंदें पूर्ण भरा रे - 3

निरसुनियां कामक्रोध । करुनि इंद्रियां दृढ निरोध ।
जेणें होइल ब्रह्मबोध । हा अंतरिं घ्या शोध बरा रे -4

सोहिरा म्हणें हेंचि घ्यावें । दृश्यातीत मन हें व्हावें ।
फिरुनि अपुल्या मुळासि यावें । येणेंचि हा भवसिंधु तरा रे - 5