संतांचे दुर्गुण टाकुनि, श्रेष्ठचि गुण घ्यावा - धृ.

सुमनीं सुवास येतो मोठा, शेवंती सर्वांगाला कांटा - 1

दीपाअंगी अवगुण असती, प्रकाश होतां अवघे न दिसती - 2

द्वाड वनिता हे रूपवती, कामिक पुरुषा प्रियकर होती - 3

धनाची मोट ओझें भारी,  केवीं त्यागिती नर संसारी - 4

समुद्र क्षार न शमवी तहान, पुण्यासाठीं करणे स्नान - 5

हिरा कठिण नव्हे अरूवार, लेइल्या होती तालेवार - 6

क्रूर स्वभाविया रणशूर, त्याला अवश्य पाळी धूर - 7

बाळ, उन्मत्त, पिशाच्च साधु, मात्रचि घ्यावा ब्रह्मबोधु - 8

सोहिरा म्हणे ग्राहक ज्याचा, तोचि संग्रह करील त्याचा - 9